।। पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले ।।
प्राचीन श्रुतींमधील धौम्य -आरुणी तसेच रामायणातील वसिष्ठ -श्रीराम किंवा नंतरचे मत्स्येंद्र -गोरक्ष असा गुरु शिष्य परंपरेचा गंगौघ आपल्या भारत भूमीमध्ये अविरत प्रवाहीत आहे.अगदी अलीकडे म्हणजे ३०० वर्षापूर्वी या परंपरेतील एक सुवर्णपर्व साकारले.समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम कल्याण स्वामी म्हणजे अद्वैताचे रोकडे प्रमाण ."याचेनि योगे मज बहु विश्रांती " असे समर्थ रामदास स्वामी कल्याण स्वामींच्याबद्दल म्हणतात.कल्याण स्वामी समर्थांचे बहिश्चर प्राण होते असे ग्रंथ सांगत आहेत.रामघळीमध्ये सर्पदंश झाल्यावर समर्थांनी कल्याण स्वामींसाठी तेथील श्री भैरवनाथाला नवस केला होता.धन्य ते कल्याण स्वामी ज्यांच्यासाठी समर्थांनी नवस केला.
रोज १२०० सूर्यनमस्कार आणि अखंड चालणारा रामनामाचा अजपा - जप,महावाक्य पंचीकरणातील वेदांत आणि सज्जनगडावरील पाण्याचे हंडे,दासबोधाची हस्तलिखित प्रत आणि योगपट्ट बांधून योगमुद्रेमध्ये बसलेले कल्याण स्वामी यांच्याकडे थोडे विचारपूर्वक पहिले असता त्यांनी समर्थांचे तत्त्वज्ञान किती अचूकपणे धारण केले होते हे कळते.समर्थांच्या समाधीनंतर सर्वार्थाने ज्येष्ठ असूनदेखील,ते सर्वांपासून अलिप्त राहून समर्थकार्य करत राहिले. मात्र एका पत्रात ते लिहितात .
'कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेस अंतर पडेल ऐसे न करणे. "
हा बोध आपणा सर्वांसाठी आहे.
जवळ जवळ वयाच्या पन्नाशीला आल्यावर कल्याण स्वामी डोमगावला आले.त्यानंतर तिथे त्यांनी केलेल्या समर्थ कार्याच्या खुणा आजही गावागावांत सापडतात.ती परंपरा आजही अखंडित आहे.
समर्थांच्या अस्थिविसर्जनाचा योग साधून त्याबरोबरच पंचत्वात विलीन होणारे कल्याण स्वामी म्हणजे गुरुभक्तीची परिसीमा होय.ज्यांच्या अस्थींमधून 'विठ्ठल विठ्ठल ' नामाचा गजर चालू होता ते श्री संत चोखामेळा काय किंवा श्री कल्याण स्वामी काय यांची दिव्य चरित्रे पाहून बुद्धी खुंटते ,शब्द तोकडे पडतात..
आजही सज्जनगडावर समर्थांच्या समाधीसमोर 'श्रमहरणीनिवास माझे कल्याण माये।' हे भजन म्हटले जाते.ती श्रमहरणी सीना नदी ,त्यांचे समाधीस्थान डोमगाव ,त्यंच्या वास्तव्याने पुनीत झालेला तो परिसर यांना तीर्थक्षेत्रत्व प्राप्त झाले आहे.
आपले चित्त श्री कल्याण स्वामी चरणी लागले कि सर्वांचे कल्याण होईल असा स्वामींचा आशीर्वाद आहे.
||पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा