Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

गुरुवार, २३ जुलै, २०२०

योगिराज श्रीकल्याणस्वामी स्थापित श्रीमारुती




।। श्रीराम समर्थ।। 

श्रीसमर्थशिष्य योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी बारामती येथील ग्रामजोशी श्री. लोणकर कुटुंबीयांकडे आपल्या हाताच्या नखांनी मारुती कोरून त्याची स्वहस्ते स्थापना केली. त्या वेळेपासून श्रीकल्याणस्वामींनी बारामती येथील पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरातील रामनवमी उत्सवाची एक प्रथा घालून दिली. त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यास श्रींची पालखी वाजतगाजत या मारुतीला भेट व उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी निघते. पालखी लोणकर वाड्यात आल्यावर मारुतीस रुद्राभिषेक होतो. आरती नंतर सर्वांना खिरापत व पन्हे प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. यानंतर पालखी पुन्हा राम मंदिरात येते व श्रीराम नवरात्रोत्सवास आरंभ होतो. हे श्रीराम मंदिर म्हणजेच श्रीकल्याणस्वामी यांचे शिष्य श्री रामजीदादा यांचे समाधी मंदिर होय. यांचा मूळ मठ बारामतीच्या दक्षिणेस असून, तो "तीन वेस मारुती" किंवा "मळदचा मारुती" या नावे प्रसिद्ध आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रामनवमी दिवशी श्रींचा छबिना या मारुतीस उत्सवास आणण्यास निघतो. मठात पोहोचल्यावर तेथे आरती होते व छबिना पुन्हा राम मंदिराकडे निघतो. सकाळी ११.५० ते ११. ५५ च्या दरम्यान छबिना राम मंदिराच्या आवरात पोहोचतो व गाभाऱ्यात येतो व बरोबर १२.०० वाजता श्रीराम जन्माचा गुलाल उधळला जातो. यानंतर दशमीस सायंकाळी रामराय पुन्हा मूळ मठाकडे मारुतीरायास पोहोचवण्यासाठी निघतात व मठात पोहोचल्यावर मानाच्या सवाया व जोहार गायला जातो. त्यानंतर आरती होऊन सर्वांना लाह्या प्रसाद म्हणून दिल्या जातात व छबिना  पुन्हा मंदिराकडे निघतो. मंदिरात आल्यावर मानाचे विडे दिले जातात व उत्सवाची सांगता होते. 

या दहा दिवसांच्या उत्सवाची सुरुवात कल्याणस्वामी यांनी ३०० वर्षांपूर्वी घालून दिली जी अजूनही अखंडपणे लोणकर यांचाकडील मारुतीच्या पूजनाने सुरु होत आहे. या मारुतीचा नुकताच जीर्णोद्धारीत मंदिरात पुनर्प्राणप्रतीष्ठापना सोहळा पार पडला.

३ टिप्पण्या: