श्रीराम मंदिर, पांगरी मठ
श्रीराम मंदिर, पांगरी मठ, ता. बार्शी, जि. सोलापूर हा सदगुरू समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य असलेल्या योगिराज श्रीकल्याणस्वामींच्या शिष्यपरंपरेतील रामदासी मठ आहे. गावाच्या पूर्वेकडून आलेल्या नीलकंठा नदीच्या काठावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी महादेवाचे पूजन केले आणि नीलकंठेश्वराची स्थापना करुन आपल्या पदस्पर्शाने हा अवघा भाग पावन केला आहे.
* सदगुरू रामाजीबुवा
पांगरी मठाचे आद्य मठपती, समर्थ संप्रदायातील सदगुरू रामाजीबुवा हे योगिराज श्रीकल्याणस्वामींचे शिष्य होते. त्यानुसार समर्थ रामदास स्वामी – योगिराज श्रीकल्याणस्वामी – सद्गुरू रामाजीबुवा अशी या मठाची गुरुशिष्य परंपरा आहे. सदगुरू रामाजीबुवा हे अधिकारी सत्पुरुष होते. त्यांनी नजीकच्या दत्तस्थानाजवळ मारुतीरायांची स्थापना केली. मठामध्ये पूर्वाभिमुख मारुतीराय विराजमान असून वर रामपंचायतन प्रतिष्ठापित केलेले आहे. सदगुरू रामाजीबुवांनी पांगरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रामभक्ती, बलोपासनेचा प्रसार केला. योगिराज श्रीकल्याणस्वामींच्या शिष्यमंडळामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. रामाजीबुवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देताना श्रीकल्याणस्वामींच्या डोमगाव येथील समाधीमधून हुंकार निघत असत. रामाजीबुवांचे गुरुबंधू तडवळे मठपती जगन्नाथ तथा जगज्जीवन स्वामी पांगरी मठामध्ये येत असत. त्यावेळी रामाजीबुवांच्या शिष्य परिवाराने त्यांना भक्तिमार्गाच्या प्रसारार्थ अत्यंत कमी कालावधीत ‘जोड दासबोध’ (दोन शिष्यांनी मिळून श्रीमत् दासबोधातील प्रत्येक समास लिहिला.) लिहून अर्पण केला.
पांगरी मठाला श्रीक्षेत्र सज्जनगड येथे होणाऱ्या दासनवमी उत्सवातल्या चांदीच्या
काठीच्या (राजदंड) गुरुसेवेचा मानही प्राप्त झाला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून पांगरी मठाचे
मठपती अव्याहतपणे ही सेवा श्रीसमर्थचरणी रुजू करत आहेत. अशा प्रकारची सेवा
पांगरीकर रामदासी मंडळींकडून घडणे हे आपल्या गावासाठी अत्यंत गौरवपूर्ण आहे.
* रामाजीबुवांची समाधी
मुख्य मंदिरातच मठाचे आद्य मठपती सदगुरू रामाजीबुवांची
समाधी आहे. त्यावर शंकराची पिंडी असुन सदगुरुचरणपादुका कोरलेल्या आहेत. समोर दासमारुती विनम्रभावाने उभे असुन बाजुलाच अकरा मारुतींची स्थापना करण्यात आलेली आहे. रामाजीबुवांनंतरच्या दोन सत्पुरुषांची समाधीस्थानेही त्या
परिसरातच आहेत. हा सर्व परिसर
एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
* मठामध्ये होणारे उत्सव
सध्या मठामध्ये रामनवमी, गुरुपौर्णिमा, रामाजीबुवांची पुण्यतिथी, शनी अमावास्या हे नैमित्तिक सांप्रदायिक उत्सव नित्यनेमाने सुरु आहेत. शनी अमावास्येला मठातील मारुतीरायांना तैलाभिषेक करण्यात येतो.
मठातील मठपतींची नावे व त्यांच्या पुण्यतिथी पुढीलप्रमाणे
१) |
आद्य मठपती श्री. रामाजीबुवा |
श्रावण वद्य त्रयोदशी |
२) |
श्री. अनंतबुवा |
भाद्रपद वद्य द्वादशी |
३) |
श्री. अनंतबुवा(बापु) |
माघ वद्य प्रतिपदा |
४) |
श्री. रामबुवा |
कार्तिक शुद्ध पौर्णिमा |
५) |
श्री. लखुबुवा |
माघ शुक्ल सप्तमी |
६) |
श्री. अनंतबुवा |
|
।। रामाजीबुवांची आरती ।।
जय जयजी आरती
सदगुरु रामा।
नमिता तवपदी संहरी
कामा।।ध्रु।।
सगुणरुपा गुण शांतीस्वरुपा।
निर्गुणरुपा अनंता
अरुपा ।।१।। जय जयजी...
तवपदी भाव जया दृढ झाला।
अहं ममतेचा न घाली
घाला।।२।। जय जयजी...
पहाता तवपदी मीपण निमाले।
प्रत्ययी राघव साक्षत्व
सरले।।३।। जय जयजी...
।। सदगुरु पूर्ण दयाळ ।।
रामाजीबावांचे चरणी मन माझे लागो।
दुस्तर हा भवसागर
तरेन हे चि दान मागो।।
ज्याचा निश्चय सदगुरुचरणी तनुमन अर्पिले।
पूर्णत्वाचा लाभ चि
पाऊनि स्वसूख अनुभविले।।
कल्याणाचे समाधीतुनिया हुंकार चि निघती।
ऐसा ज्याचा दृढतम
निश्चय दीनासि तारिती।।
पांगरीस हे पुर्ण समाधी सुशोभित ही।
दर्शनमात्रे पावन
केले जनासी अवघ्या ही।।
अनुष्ठान हे हनुमंताचे केले जयाने।
प्रसन्न होउनि वर मागितला
भक्ताकारणे।।
ऐसा सदगुरु पूर्णदयाळ हरीला तारीतो।
आपणा ऐसे करुनी भवबंधाते छेदितो।।