Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

शनिवार, ९ जुलै, २०१६

सोलीव सुख वाचनवेध प्रकल्प




पुस्तकाचे नाव  :    सोलीव सुख वाचनवेध प्रकल्प
लेखिका  : रत्नप्रभा रवींद्र जोशी
प्रकाशन : श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन,मुंबई केंद्र
मूल्य : 250 रुपये  l पृष्ठसंख्या : 232

पुस्तकासाठी संपर्क - सुरेंद्र गोगटे
9422019450, 8605567657


"सर्वेऽपि सुखिन: सन्तु' अशा विश्वसुखाची प्रार्थना करणारे महामानव - द्रष्टे संत स्वत:च्या सुखासाठी प्रार्थना करीत नाहीत. कारण व्यावहारिक सुखाने आम्ही फुलून जातो न् जातो, तोच मिटवून टाकणारे दु:ख येते. असे एखादे सुख असेल का, जे कधीही संपणार नाही.... हिणकसपणा किंवा हीण काढून टाकल्यावर उरणाऱ्या शुध्द सोन्यासारखे सुख असेल का? सर्वात्मक भगवंताशी योग जुळला, तरच असे सुख मिळू शकते. समर्थ रामदासांनी यालाच 'सोलीव सुख' म्हटले आहे.
वरची साले मोकळी करून गाभ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे ती वस्तू सोलणे. केळयाला एकच साल असते. पण केळफुलाची अनेक आवरणे दूर करावी लागतात, आतले केळयाचे कोंब निवडावे लागतात, मग ती भाजी करण्यालायक होतात. लालसर गुलाबी पाने गुलाबी होतात. हळूहळू ती हिरवट पांढरी होतात. आत आत जाऊ, तसे कोंब कोवळे असतात. निवडावे लागत नाहीत. पानेही कोवळी असतात. आतला गाभा न सोलता चिरता येतो. केळीची सोपटे सोलत गेले, तर शेवटचे आवरण काढल्यावर आतली पोकळी बाहेरच्या आकाशात विलीन होते. आत काहीच उरले नाही असे वाटते. पण तेच खरे सोलीव चैतन्य असते. त्याचे ज्ञान होणे, तेच होऊन जाणे यामुळे मिळणारे सुख ते सोलीव सुख. हाच शाश्वत आनंद.
'सोलीव सुख' ही संकल्पनाच मोठी गोड आहे. फळे सगळयांना आवडतात. पण फळे खाताना सोलावी लागतात. पण कुणी जर फळ सोलून त्याचे तुकडे खायला दिले, तर किती बरे वाटते! मोसंबी किंवा संत्री कुणी बिया व साली काढून खायला दिले, किंवा हापूस आंबा सोलून त्याचा रस प्यायला दिला, तर कष्टाश्ािवाय फळ खाल्ल्याचा आनंद मिळेल. शरीरालादेखील फळांप्रमाणे सालाचे आवरण आहे. आपल्याला डोळयांनी दिसणारे त्वचेचे आवरण सामान्य आहे. खरी पाच आवरणे म्हणजे पंचकोश होय. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आण्ाि आनंदमय कोश. जीव या पंचकोशाशी एकरूप होऊन त्यात अडकला आहे. आत्मज्ञानाचे सुख हवे असल्यास जिवाला हे पंचकोश सोलावे लागतील, म्हणजे मनन-चिंतनाने त्याचा निरास करावा लागेल. पंचकोशांच्या निरासानंतर जिवाला मिळणारे आत्मसुख म्हणजे सोलीव सुख होय. सद्गुरू समर्थ रामदासांच्या कृपेने कल्याणस्वामींनी ही आवरणे टाकून देऊन आत्मसुख उपभोगले. हा स्वानंद लुटताना त्यांच्यामध्ये आणि समर्थांमध्ये जे गूढ शक्तिपाताचे उपचार घडून गेले, त्याचे वर्णन कल्याणस्वामींनी केले आहे.
सोलीव सुखात अजपाची दोरी हाती दिली आहे. अजपा म्हणजे श्वासबरोबर चालणारा सहज जप. तो मुद्दाम न करता आपोआप व्हायला हवा. त्यासाठी प्रथम जाणीवपूर्वक श्वसन व्हायला हवे. दीर्घ श्वसन आणि प्राणाकर्षण क्रियांनी जाणीवपूर्वक श्वसन होते. प्राणायाम म्हणजे श्वसनावर ताबा. श्वसनाचे विविध प्रकार सूचनांप्रमाणे केले, म्हणजे श्वासावर नियंत्रण होते.
गायत्री म्हणजे सहज प्राणायाम. गायत्रीचे उच्चारण हठयोगातील वैखरी, उपांशु मानस या स्तरांवर, तसेच वैखरी, उपांशू, मुखस्थ, कंठस्थ, प्राणस्थ, मानस या सात पायऱ्यांमध्ये करणे.
सोलीव सुख हे समर्थ रामदासांचे पन्नास ओव्यांचे काव्य आहे. मुख्यतः योगसाधनेवर यात भर आहे. शिष्यावर गुरुकृपा झाली की गुरू शक्तीचे संक्रमण करतात. त्याला गुरुपदच देतात. समर्थ रामदासस्वमींचे परमशिष्य कल्याणस्वामी तशा योग्यतेचे होते. कल्याणांनी मागणी केली आणि समर्थांनी ती पुरवली. त्यांना अंतिम टप्प्यांवर पोहोचवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांना ऐक्याचा अनुभव दिला. सामान्य साधकांना कल्याणस्वामी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवू शकतील, अशी गुरुतत्त्वाची दीक्षा दिली. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा